चिपळूण बसस्थानक काम एप्रिल अखेर पूर्णत्वास
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडून पाहणी, प्रवाशांना सुविधा देण्यावर भर
चिपळूण
येथील हायटेक बस स्थानकाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाची शुक्रवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाहणी केली. यावेळी या बसस्थानकाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ठेकेदार तेजस शिंदे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत ठेकेदार शिंदे यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे मूळ अंदाजपत्रक २०१६ साली तयार करण्यात आले. मात्र कोरोना काळात निधीत कपात झाल्याने सुरुवातीला ५.८५ कोटी रुपयांना मंजूर असलेले काम आता २.८७ कोटी रुपयांमध्ये पूर्ण केले जात आहे. सध्या काम वेगाने सुरू असून एप्रिल अखेर काम पूर्ण करून बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल.
नगराध्यक्षांनी पाहणीदरम्यान शौचालय अंतर्गत भागात घेण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच १५ जानेवारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी घेऊन येण्यात येईल व पहिल्या मजल्यावर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात येईल, असे सकपाळ यांनी सांगितले.
सकपाळ यांनी कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच शासन व नगर पालिकेच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही दिली. यावेळी आगारप्रमुख दीपक चव्हाण, नगरसेवक निहार कोवळे, स्वप्नील भोसले, स्वरुप माने, गौरव उदेग आदी उपस्थित होते.