धामणसे ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ उत्साहात संपन्न
विविध उपक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती; लाभार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी:
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५’ अंतर्गत धामणसे ग्रामपंचायतीमध्ये १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध प्रबोधनात्मक आणि कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
अभियान काळात महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ज्या महिलांचे हिमोग्लोबिन १० पेक्षा कमी आढळले, त्यांना मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत फेरस सल्फेट गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील बालकांना सकस आहाराचे वाटप करून कुपोषणमुक्तीचा संदेश देण्यात आला.
जनजागृतीसाठी जिल्हा परिषद शाळा धामणसे क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी पंचायतराज अभियानावर आधारित प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले, तर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यसनमुक्ती’वर प्रभावी पथनाट्य सादर करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. ‘आर्ट ऑफ लिविंग’ संस्थेमार्फत योगसाधना आणि मेडिटेशनचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते घराच्या चाव्या सुपूर्द करून सन्मानित करण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले.
’खेळ पैठणीचा’ आणि सांस्कृतिक सोहळा
कार्यक्रमाच्या सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विजयी महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच श्री. अमर रहाटे, उपसरपंच ऋतुजा कुलकर्णी, रत्नेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मुकुंद जोशी, माजी सरपंच अविनाश जोशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील लोगडे, ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी, माजी सरपंच विलास पांचाळ, ग्रामपंचायत अधिकारी देविदास इंगळे, नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी, उद्योजक अविनाश कुलकर्णी आणि इतर ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री. देविदास इंगळे यांनी केले, तर आभार सरपंच श्री. अमर रहाटे यांनी मानले.