ओव्हरलोड वाहतूक विरोधात प्रथमेश गावणकर यांची गांधीगिरी
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते हातखंबा हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, कंपनीच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक अनेक निरपराध नागरिकांच्या बळीला कारणीभूत ठरत आहे. प्रशासन आणि या परिसरातील कंपनी व्यवस्थापन वारंवार आंदोलने करूनही दाद देत नसल्यामुळे, हताश झालेल्या प्रथमेश गावणकर यांनी वाहतूकदार डंपर चालकांना शनिवारी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच, ‘अजून बळी घेण्यासाठी शुभेच्छा’ देत या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
मागील काही महिन्यांमध्ये जयगड-हातखंबा रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. प्रशासनाच्या ‘चुकीच्या धोरणामुळे’ सर्वसामान्य जनतेचे बळी जात असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी केला आहे. साधारणत: २००५ पासून या परिसरातील जेएसडब्ल्यू पोर्ट आणि आंग्रे पोर्टच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतुकीला सुरुवात झाली. सुरुवातीला त्रास कमी जाणवत होता, मात्र मागील १० वर्षांत माल वाहतुकीत मोठी वाढ झाली असून, त्या तुलनेत रस्त्याची क्षमता वाढलेली नाही.
क्षमेतपेक्षा जास्त असलेली ओव्हरलोड वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आणि चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर दर महिन्याला किमान एका निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यालगत अनेक शाळा आणि महाविद्यालये असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे अनेकदा वाहतूक ठप्प होते. एकूणच, सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांच्या रोषातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’तर्फे प्रशासन, आरटीओ, पोलीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली आहेत. योग्य ती कार्यवाही व उपाययोजना न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशाराही गावणकर यांनी दिलेला होता.
मात्र आजही जयगड मार्गावर ओव्हरलोड डंपर वाहतूक राजरोस सुरू असल्याने, प्रथमेश गावणकर (अध्यक्ष, खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “वाहतुकीला अडवणूक करण्याचे कारण नाही, पण अगोदर रस्ता अरुंद, त्यात नागरिक, विद्यार्थी यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत वाहतुकीबाबत बेफिकीरी सुरू आहे. त्यामुळे आता रस्ता आंदोलन करण्यापेक्षा अजून या वाहतूकदारांनी अशाप्रकारे बेफिकीरपणे ओव्हरलोड जास्तीत जास्त वाहतूक करावी, अपघात झाल्यानंतर प्रशासन, पोलिसांनी मग धावत यावे,” असे अगतिकपणे गावणकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मात्र, त्या प्रसांगांना प्रशासनातील संबंधित विभाग जबाबदार असतील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.