खेड तालुक्यात चोऱ्यांचा धुमाकूळ; बसस्थानक, बंद घरासह कंपनी लक्ष्य
८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास
खेड:
खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. खेड बसस्थानकात महिलेचे दागिने लांबवणे, बंद घर फोडून धाडसी चोरी करणे आणि पिरलोटे येथील कंपनीतून साहित्य पळवणे अशा तीन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी ८ लाख २९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. या सर्व प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी खेड बसस्थानकात घडली. एक महिला खेड-मंडणगड बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेतला. महिलेच्या काखेला असलेल्या बॅगेची चेन शिताफीने उघडून चोरट्याने २ लाख किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १.८० लाखांची सोन्याची चेन आणि ५,२०० रुपये रोख, असा एकूण ३ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पळवला.
दुसरी घटना वेरळ-खडकवाडी परिसरात घडली. येथील रहिवासी दिनेश दिलीप पवार हे २४ ते २५ डिसेंबर दरम्यान घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील २ तोळ्यांची सोन्याची चेन, १ तोळ्याची अंगठी आणि ६० हजार रुपये रोख, असा ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
तालुक्यातील पिरलोटे येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका कंपनीच्या कार्यालयातून २४ ते २५ डिसेंबरच्या मध्यरात्री ८४ हजार रुपयांचे मौल्यवान साहित्य चोरीला गेले. कंपनीचे व्यवस्थापक रंजन उपाध्याय यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, एका परप्रांतीय व्यक्तीने हा माल चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खेड पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा तपास सुरू केला असून प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि घर बंद ठेवताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक व खेड पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.