रत्नागिरी पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना बिबट्याबाबत महत्त्वाचे आवाहन
रत्नागिरी
रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षितते च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.बिबट्या हा सामान्यतः माणसांना टाळत असला तरी,अन्न आणि पाण्याच्या शोधात किंवा घाबरून तो वस्तीत प्रवेश करू शकतो.
अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता खालील सूचनांचे पालन करावे,असे आवाहन अधीक्षकांनी केले आहे.
लहान मुलांना रात्री घराबाहेर एकटे सोडू नका: विशेषतः संध्याकाळनंतर लहान मुलांना घराबाहेर एकटे खेळायला किंवा फिरायला पाठवणे पूर्णपणे टाळावे.अन्न आणि कचरा उघड्यावर ठेवू नका: कुत्र्याचे अन्न,कोंबडीचे किंवा उरलेले अन्न घराबाहेर उघड्यावर ठेवू नका.यामुळे बिबट्या मानवी वस्तीकडे आकर्षित होऊ शकतो.
बिबट्या सहसा प्रथम कुत्र्यांवर हल्ला करतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी कुत्र्यांना घराबाहेर मोकळे सोडू नका त्यांना बांधून ठेवा कोंबड्या आणि पाळीव पिल्लांची काळजी घ्या:घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत कोंबड्या किंवा पिल्लू ठेवताना सावधगिरी बाळगा.रात्रीच्या वेळी त्यांना घरामध्ये घ्या किंवा मजबूत जाळी असलेल्या पिंजऱ्यात ठेवा.बिबट्या जवळ दिसल्यास घाबरून गोंधळ करू नका,शांतपणे मागे सरा.
बिबट्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नका स्वतःला मोठा दाखवण्यासाठी हात वर करून प्रयत्न करा.हळू हळू मागे फिरून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा.
बिबट्याने हल्ला केल्यास त्वरित पोलिस नियंत्रण कक्ष १००/११२ या क्रमांकावर फोन करा.नागरिकांनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिबट्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. तो घाबरल्यास अधिक धोकादायक ठरू शकतो.वन विभागाला बोलावणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.पोलिस अधीक्षकांनी सर्व नागरिकांना एकमेकांना सावध करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.