विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करा
शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : नवनीत फाउंडेशन, मुंबई, जिल्हा परिषद पोमेंडी बीट व रत्नागिरी नगर परिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दामले विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांसाठीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री . किरण लोहार बोलत होते . चौथी, पाचवी व सातवी, आठवी या इयत्तांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे 15 व 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेचा 10O शिक्षकांनी लाभ घेतला .
या निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी श्री चंद्रकांत सूर्यवंशी, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा . श्री . सुधाकर मुरकुटे मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे नवनीत फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख सचिन पवार, विभाग प्रमुख रोहित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते .
श्री . लोहार म्हणाले, सध्याची मुलं मुळातच हुशार आहेत . मात्र त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सहज सोप्या पद़धतीने समजावणारा मार्गदर्शक आवश्यक असतो . आपण सर्व शिक्षक हे काम करतच असता मात्र त्यासाठी प्रेरणा म्हणून ही कार्यशाळा आहे .
यावेळी राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक श्री . नामदेव धनावडे, श्री . संपत शेलार, श्री . रामदास गोळे यांनी पहिल्या दिवशीच्या सत्रात शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त क्लृप्त्या व सूत्रे, तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी अतिशय सोप्या पद्धतीने कशा सोडवाव्यात याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात शिक्षकांना गणित समृद्धीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी मुख्याध्यापक श्री . मोटे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .
श्री चंद्रकांत सूर्यवंशी यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते यावर निर्माण करण्यासाठी शिक्षकाने स्वप्रेरणेने काम करायला हवे .
शिक्षकांना उदबोधित करताना श्री . मुरकुटे म्हणाले, प्रत्येक शिक्षकाने कामाचा आनंद घेतल्यास शिष्यवृत्ती परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी बसवून गुणवत्ताधारक विद्यार्थी निर्माण करणे, सहज शक्य होईल. त्यासाठीच या कार्यशाळेचा उपयोग बूस्टर म्हणून करावा व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगावा, असेही ते म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . सचिन पवार यांनी, तर सूत्रसंचालन श्री . योगेश कदम यांनी केले. नवनीत फाऊंडेशनने केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल प्रशासन अधिकारी श्री . मुरकुटे यांनी त्यांचे आभार मानले व यापुढेही यापेक्षा मोठ्या कार्यशाळा आयोजनाचा मानस व्यक्त केला .