मांदिवली पूलाची वाट बिकट;क्षमतेहून अधिक अवजड वाहनांची वाहतूक
दापोली: दापोली तालुक्यातील मांदिवली येथील पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहनांची बेछूट वाहतूक सुरू असल्याने पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ १८ टन वहनक्षमता असलेला हा पूल रोज ३० टनांहून अधिक क्षमतेचे डंपर सहज करत असल्याने पुलाची अवस्था डळमळीत झाली आहे. या अतिताणामुळे पूल कोसळण्याची भीती मांदिवली आणि केळशी परिसरातील ग्रामस्थांमध्ये पसरली आहे.
रोजगार व वाहतुकीच्या नावाखाली या महत्त्वाच्या मार्गावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. पुलाच्या सुरक्षिततेसाठी मर्यादा असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याने स्थानिकांनी वारंवार आवाज उठवला आहे, पण ही बेछूट वाहतूक नियंत्रणात आणली जात नाहीये.
सामाजिक कार्यकर्ते भावेश कारेकर यांनी सांगितले की, “पुलाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही संबंधित बांधकाम विभागाला कळविले आहे. मात्र, कारवाईचा अधिकार परिवहन विभागाकडे असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्यात येत आहे.”
संबंधित विभागांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “पूल जमीनदोस्त झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल प्रशासनाने न घेतल्यास, हा विषय नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी येथील नागरिक विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. पुलाला धोका निर्माण झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.