राजापूर तालुक्यात बिबट्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ
वनविभागाच्या भूमिकेवर ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी
राजापूर: राजापूर तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात बिबट्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची धक्कादायक माहिती स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर व्हायरल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे कथित विद्रूप स्वरूप, नदीपात्रात वाहत असणे आणि शरीराचे अवयव कापून नेल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल पोस्टनुसार, हा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत सापडला असून, त्याचे अवयव कापून नेल्याची गंभीर चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, ही माहिती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊनही स्थानिक वनविभागाने याबाबत मौन बाळगल्याचा आणि अत्यंत गुप्तता पाळल्याचा तीव्र आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वनविभागाकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती, स्पष्ट नोंद किंवा तातडीच्या तपासाची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. “या प्रकरणात विलंब का केला जातोय? माहिती बाहेर येऊ नये म्हणून जाणूनबुजून वेळ खेचली जात आहे का?” असा थेट प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, वाघ, बिबट्या यांसारख्या संरक्षित प्राण्यांच्या मृत्यूची घटना घडल्यास तात्काळ पंचनामा, तपास आणि नमुने संकलन करणे बंधनकारक असते. मात्र, सोशल मीडियावर पोस्ट फिरत असतानाही वनअधिकारी शांत बसणे म्हणजे अत्यंत गंभीर दुर्लक्ष असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
”प्रत्यक्षात अशी क्रूर घटना घडली असल्यास आणि ती स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली असल्यास, त्यांनी आतापर्यंत मौन का ठेवले? नागरिकांना माहिती का देत नाहीत? घटनास्थळी जाऊन तपास केला गेला की नाही?” असे सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारले आहेत.
अधिकृत माहितीच्या अभावामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर संभ्रमित झाले आहेत. सोशल मीडियावरील उलटसुलट चर्चांमुळे भीती आणि तणाव वाढत असून, वनविभागाने तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी आणि पारदर्शक तपास जाहीर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाची शांतता आणि व्हॉट्सअॅप पोस्टची वाढती माहिती यामुळे संपूर्ण तालुक्यात या बिबट्याच्या संशयास्पद मृत्यूभोवती संशयाचं गडद वातावरण निर्माण झालं आहे.