हातखंबा ईश्वर ढाबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत नेपाळी पादचारी ठार
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा ईश्वर ढाबा येथे वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अंतराम्मु चौधरी (५५, नेपाळ), असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, चौधरी हा हातखंबा ते निवळी असा पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरून चालत जात होता. यावेळी ईश्वर ढाबा येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. तो जागीच ठार झाला. धुक्यामुळे चौधरी हा दिसला नसावा त्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी गाडीचे पार्ट पडलेले दिसून येत आहेत. सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या रुग्णवाहिकेने चौधरी या नेपाळीला तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. याबाबतचा तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत.