रत्नागिरीत ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षांची भव्य बाईक रॅली
रत्नागिरी: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, रत्नागिरी शहरात शनिवारी सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने अभूतपूर्व ‘महा बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली ताकद व एकीचे दर्शन घडवले.
शहरातील मारुती मंदिर येथून या भव्य रॅलीचा आरंभ झाला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे तिचा समारोप झाला. ही रॅली केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन नव्हती, तर ‘शिवशक्ती’ आणि ‘राष्ट्रशक्ती’च्या एका मजबूत राजकीय युतीचा एल्गार होती, ज्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
या बाईक महा रॅलीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान आमदार भास्करराव जाधव, पक्षाचे उपनेते बाळ माने यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने आणि उबाठा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार या रॅलीत सक्रियपणे सहभागी झाले होते. उमेदवारांनी नागरिकांचे अभिवादन स्वीकारत, आगामी निवडणुकीत या उमेदवारांना प्रचंड पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
रॅलीची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात झाली. सर्वप्रथम, मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार भास्करराव जाधव यांनी व रॅलीतील सर्व प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. शिवछत्रपतींना वंदन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, ज्यामुळे या रॅलीला ऐतिहासिक आणि वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले.
या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी झालेला तरुण वर्ग आणि महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग. ‘महाराष्ट्रातील बदल’ आणि ‘युतीचे सरकार’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भगवे आणि नीळे झेंडे हातात घेऊन, बाईकस्वार तरुण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांनीही दुचाकींवर स्वार होऊन किंवा मागे बसून रॅलीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे रॅलीला एक वेगळी ऊर्जा आणि महत्त्व प्राप्त झाले.
या महा बाईक रॅलीने रत्नागिरी शहरात एक मोठी लाट निर्माण केली असून, सामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार केले आहे.