ठाकरे सेनेत पुन्हा ‘नाराजीनाट्य’ चव्हाट्यावरदेवरुखमधील सभेला विनायक राऊतांची दांडी!
देवरुख: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेत माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांच्याच वादाची ठिणगी पडली आहे. याचे परिणाम पालिकेच्या प्रचारात दिसत असनाचा मातोश्रीवरून भास्कर जाधवांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. यानंतर ते पक्षाच्या प्रचार सभेला हजर झाले. मात्र विनायक राऊत यांनी सभेला दांडी मारल्याने येथील वादावर अद्याप पडदा पडलेल्या नाहीच हेच समोर आले आहे.
कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेत येथे नाराजी नाट्य रंगले आहे. युतीसाठी प्रयत्न करणारे भास्कर जाधव यांना बाजूला करत शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्याचा आरोप त्यांनीच काहीच दिवसांपूर्वी केला होता. तर त्यांनी याबाबत येथील माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर केला होता.
तसेच आपल्याला का बाजूला करण्यात आले याचे उत्तर नसून आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला शब्द दिला आहे. त्यामुळे रमेश कदम यांचाच प्रचार करणार अशी ठाम भूमिका घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले. तर यावेळी शिवसेनेचे उमेदवार पडले तरीही आपल्याला फरक पडत नाही असेही भास्कर जाधव यांनी म्हटले होते.
Bhaskar Jadhav Video : भास्कर जाधवांवर उद्धव ठाकरे नाराज, ‘मातोश्री’वरून पाठवला खास संदेश? शरद पवारांच्या उमेदवाराचे कनेक्शन समोर
दरम्यान भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांचा जाहीरपणे सभा घेत प्रचार सुरू केला होता. याच पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवरून भास्कर जाधव यांना संपर्क साधण्यात आला होता. तसेच त्यांना पक्षाचे कोणतेही नुकसान होईल असे कोणतंही पाऊल उचलू नका, असा सल्ला वजा कानपिचक्या देण्यात आल्या होत्या.
या आदेशानंतर भास्कर जाधव कोणता निर्णय घेतात याकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. तोच देवरुखमधील प्रचार सभेला भास्कर जाधव यांनी हजेरी लावली. तर यावेळी नायक राऊतही उपस्थित राहणार होते. दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्याने शिवसेनेतील वाद मिटल्याचे बोलले जात होते. दोघांचे फोटोही फ्लेक्सवर होते.
पण ऐन वेळी विनायक राऊत यांनी सबबेला दांडी मारली आहे. यामुळे चिपळूण नगर परिषदेच्या उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवारावरून दोघात पडलेली वादाची ठिणगी अद्याप शमलेली नाही. याच वादामुळे राऊतांनी सभेला येणं टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घटनेमुळे कोकणातील ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीतील ‘मशाल’ आणि ‘तुतारी’ या चिन्हांना मतदारांनी लक्षात ठेवावे. आमच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.