प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीच्या नौसीन काझी यांनी केला विकासकामांच्या दाव्यांचा ‘पर्दाफाश’
रत्नागिरी: प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नौसीन काझी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेल्या विकासकामांच्या दाव्यांची पोलखोल केली. त्यांनी ठोस पुरावे सादर करत विरोधकांचे दावे फेटाळून लावले, तसेच स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरून विद्यमान नेत्यांना धारेवर धरले.
नौसीन काझी यांनी विरोधक नळपाणी योजनेचे खोटे श्रेय घेत असल्याचा आरोप केला. ही योजना केवळ श्रेयवादाचा भाग नसून, वस्तुतः ती दुय्यम दर्जाची आहे, असे पुरावे सादर करून त्यांनी सिद्ध केले. जनतेला चांगल्या दर्जाची सुविधा पुरवण्यात विरोधकांना अपयश आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी निधी आणून रस्त्यांचा विकास केल्याच्या दाव्यावरही नौसीन काझी यांनी मोठा आक्षेप घेतला. त्यांनी प्रभागातील रस्त्यांची सध्याची दुर्दैवस्था पुराव्यानिशी सादर करून दाखवली. रस्त्यांची ही दयनीय अवस्था विरोधकांच्या पोकळ विकासकामांच्या दाव्यांची साक्ष देत आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरात सुरू असलेल्या टेनिस कोर्टच्या कामावर नौसीन काझी यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, या कामाचा स्थानिक जनतेला कोणताही फायदा होणार नाही. याउलट, त्या जागेवर जर व्यापारी संकुल उभारले असते, तर येथील स्थानिक युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध झाला असता. हा विकास करताना स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी दर्शवले.
कब्रस्तान) विषय निवडणुकीच्या तोंडावर केवळ खोटे श्रेय घेण्यासाठी करणे योग्य नाही. या कामासाठी कोणा एका व्यक्तीचे नाही, तर सर्वांचे एकत्रित प्रयत्न कारणीभूत आहेत, असे नौसीन काझी यांनी ठणकावून सांगितले.
तसेच, अद्ययावत जिम बनवल्याच्या विरोधकांच्या दाव्यावरही त्यांनी मोठा सवाल केला: “ती जिम नेमकी आहे कुठे? आणि येथील स्थानिक युवक त्याचा काय लाभ घेत आहेत?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी नौसीन काझी यांनी माजी नगरसेवकांना टोला लगावताना एक थेट प्रश्न विचारला, “जर तुम्ही खरोखर विकासकामे केली असतील, तर तुम्हाला कसली भीती? तुम्ही निवडणुकीला सामोरे का जात नाही आहात? तुम्ही निवडणूक का लढवत नाही आहात?” असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
नौसीन काझी यांनी यावेळी मतदारांना आश्वासित केले की, महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष श्री अजित दादा पवार यांच्याकडून प्रभाग क्रमांक ४ साठी विकासाचा भरघोस निधी आणून, प्रभागात विकासाची गंगा आणली जाईल.
त्यांनी स्थानिकांना आवाहन केले की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ या निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे.