रत्नागिरीत वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत वृद्धाचा दुर्दैवी अंत; एमआयडीसी रेल्वे पुलाजवळ घडली घटना
रत्नागिरी : मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसून एका ७६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी एमआयडीसी परिसरात घडली आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घडलेल्या या अपघातात कुवारबाव येथील वृद्धाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. बंड लक्ष्मण शिंदे (वय ७६, रा. रविंद्रनगर, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी) असे रेल्वे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मडगाव ते मुंबई ही गाडी क्रमांक २२२३० ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आपल्या नियमित वेळेत धावत होती. सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास ही गाडी रत्नागिरी एमआयडीसी भागातील रेल्वे पुलाजवळ आली असता, किलोमीटर क्रमांक २०५/०८ या ठिकाणी एक व्यक्ती रेल्वेला धडकल्याचे लोको पायलटच्या निदर्शनास आले. लोको पायलट यांनी या घटनेची माहिती तात्काळ रत्नागिरीचे स्टेशन मास्तर समीर डोंगरे यांना दिली. स्टेशन मास्तरांनी प्रसंगावधान राखून रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) ड्युटी इंचार्ज अतुल आनंदराव यादव आणि लोहमार्ग पोलिसांना घटनेची खबर दिली.
माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल आरागडे आणि पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, धडक इतकी जोरदार होती की, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बंड शिंदे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी खबर देणार अतुल यादव यांच्या फिर्यादीवरून २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस) कलम १९४ अन्वये ९६/२०२५ क्रमांकाने या घटनेची नोंद झाली असून, रविंद्रनगर भागातील एका वृद्धाचा अशा प्रकारे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.