हातखंबा घाटात अपघातांची मालिका कायम; कीटकनाशक वाहून नेणारा टँकर लटला
रत्नागिरी : हातखंबा परिसरातील अवघड चढणीवर टँकर पलटण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून आजची दुर्घटना ही या पट्ट्यातील जवळपास चौथी घटना असल्याचे समोर आले आहे. सततच्या अपघातांनी या धोकादायक वळणाची असुरक्षितता पुन्हा एकदा उघड केली आहे.
बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक वाहून नेणारा टँकर अचानक पलटी झाला. प्राथमिक माहितीनुसार, टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर भर रस्त्यावर उलटा पडला. या टँकरमध्ये कीटकनाशक भरलेले असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये म्हणून अत्यंत दक्षतेने मदतकार्य सुरू करण्यात आले.
अपघातानंतर जवळपास तास दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर अडकलेल्या वाहनांची रांग व्यवस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काही तासांत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या वळणाच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. या मार्गावरील ट्रॅफिक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणीही जोर धरताना दिसत आहे.