देवरुख नगराध्यक्षपदासाठी ‘गाव विकास समिती-आप’ युतीच्या उमेदवार दिक्षा खंडागळे यांच्याकडून ‘गॅरंटी कार्ड’ सादर
३० दिवसांत आई- बाबा आरोग्य सेवा योजना, वर्षाभरात ३०० लिटर मोफत पाणी आणि मोफत अभ्यासिका देण्याचे आश्वासन
देवरुख (प्रतिनिधी):
देवरुख नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ युतीच्या उमेदवार सौ. दिशा रविंद्र खंडागळे यांनी आपले व्हिजन स्पष्ट करणारे ‘गॅरंटी कार्ड’ आज मतदारांसमोर सादर केले. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे व अध्यक्ष उदय गोताड, निवडणूक प्रभारी डॉ.मंगेश कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गॅरंटी कार्ड प्रसिद्ध करण्यात आले आहे.
“खोटं आश्वासन देणार नाही, जे काम होणार तेच सांगणार” या धोरणावर आधारित हे गॅरंटी कार्ड असून, त्यांनी यात वेळेनुसार पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांची यादीच जाहीर केली आहे.
युतीच्या उमेदवार सौ. खंडागळे यांची निवडणूक निशाणी ‘झाडू’ आहे.
दिक्षा खंडागळे यांनी दिलेले गॅरंटी…
सौ. खंडागळे यांनी जनतेच्या मूलभूत गरजा आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवून खालील महत्त्वपूर्ण आश्वासने दिली आहेत:
पहिले ३० ते ६० दिवस:
- आरोग्य सेवा: पहिल्या ३० दिवसांत ‘आई-बाबा आरोग्य सेवा योजना’ तातडीने सुरू करण्यात येईल.
- शेतकरी हित: पहिल्या ६० दिवसांत शेतकऱ्यांना मोफत खत उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
तीन महिन्यांत: - देवरुखला धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व असल्याने ‘देव नगरी देवरुख पर्यटन कक्ष’ स्थापन करण्यात येईल.
पहिल्या एका वर्षाच्या आत:
*३०० लिटर मोफत पाणी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. - शैक्षणिक सुविधा: देवरुखमधील गरजू मुला-मुलींसाठी MPSC, NEET, JEE चे ३ महिन्यांचे मोफत अभ्यासिका/शिबिर आयोजित करण्यात येईल.
- क्रीडा आणि पार्किंग: पार्किंग धोरण तसेच क्रीडा धोरण आणि कबड्डी स्टेडियमबाबत निर्णय घेण्यात येईल.
पायाभूत आणि दीर्घकालीन विकास
सौ. दिशा खंडागळे यांनी तात्काळ कामांव्यतिरिक्त, देवरुखच्या मूलभूत आणि दीर्घकालीन विकासावरही भर दिला आहे. शहरात खड्डे मुक्त रस्ते, सुधारित ड्रेनेज सिस्टीम, उत्तम पायाभूत सुविधा आणि पारदर्शी व कार्यक्षम कारभारावर लक्ष केंद्रित केले जाईल.
- निवडणुकीनंतर पहिल्या दोन वर्षांत देवरुखला एक नंबर शहर बनवण्यासाठी एक विशेष आराखडा तयार केला जाईल. गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीच्या उमेदवारांनी मतदारांना ‘झाडू’ या निशाणीवर मतदान करून, परिवर्तन आणि विकासाला संधी देण्याचे आवाहन केले आहे.