आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शैलेश जाधव पंच तर नंदकुमार शिंदे यांची प्रशिक्षक म्हणून निवड
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग महासंघाने थायलंड येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘जागतिक प्रो अप शो बेस्ट इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिप २०२५’ आणि ‘आशियाई चॅम्पियनशिप २०२५’ साठी रत्नागिरीतील शैलेश जाधव यांची आंतरराष्ट्रीय पंच आणि चिपळूण येथील नंदकुमार शिंदे यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
या स्पर्धा थायलंडमधील पटाया येथे २७ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहेत.

आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झालेले शैलेश जाधव हे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे २५ वर्षे संस्थापक कार्यवाह म्हणून कार्यरत होते आणि सध्या ते कार्याध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. एक उत्तम व्यायामपटू आणि राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची ओळख आहे. ते ‘फिनिक्स फिटनेस’ व ‘हार्डकोअर जिम’चे मालक आहेत.
भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झालेले चिपळूण येथील नंदकुमार शिंदे हे आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जातात. ते रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
या दोन्ही मान्यवरांच्या निवडीमुळे रत्नागिरी आणि कोकणचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे. रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशन, फिनिक्स जिम, क्रीडाप्रेमी आणि समाजातील सर्व स्तरांमधून या दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या शरीरसौष्ठव परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.