हातखंबा–तारवेवाडी बससेवेचा पाच वर्षांचा अपघातमुक्त प्रवास
ग्रामस्थांचा चालक–वाहकांना सन्मान
रत्नागिरी:
रत्नागिरी हातखंबा–तारवेवाडी शहरी वाहतूक बससेवेनं अपघातमुक्त पाच वर्षांचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण करताना ग्रामस्थांनी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. 21 नोव्हेंबर 2025 रोजी या सेवेला पाच वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने हातखंबा येथे आयोजित कार्यक्रमाला गावकरी, नियमित प्रवासी तसेच एस.टी. विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हातखंबा व परिसराला थेट रत्नागिरी शहराशी जोडणारी स्वस्त, सुरक्षित आणि सुविधायुक्त अशी ही बससेवा ग्रामीण भागासाठी वरदान ठरल्याचं प्रतिपादन ग्रामस्थांनी यावेळी केलं. या सततच्या आणि सुरक्षित सेवेसाठी कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून बसगाडीची विधिवत पूजा करून चालक उत्तम कोलगे व वाहक सुकेशिनी पवार यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच, या सेवेला अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणारे एस.टी. प्रवासीमित्र प्रज्वल दळवी, सोहम बापट, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संजय देसाई यांचा ‘पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज’ हा संदेश देत शाल, श्रीफळ आणि रोप देऊन गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी या मार्गावरील पहिली फेरी ज्या चालकांनी साधली होती, त्याच उत्तम कोलगे आजही कर्तव्यावर हजर होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धूळ उडवत धावणाऱ्या एस.टी. बसेस या महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाचा दुवा आहेत. आपल्या गावासाठी उपलब्ध असलेल्या या बससेवेचा ग्रामस्थांनी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंचवार्षिक प्रवासाचा आनंद साजरा करताना ग्रामस्थांनी एस.टी.च्या या जीवनवाहिनी सेवेनं पुढील काळातही अशीच सुरक्षित, नियमित आणि जनहितार्थ काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.