‘मिशन साहसी’ अंतर्गत विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर
रत्नागिरी: राणी लक्ष्मीबाई जयंती आणि राष्ट्रीय स्त्रीशक्ती गौरव दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रत्नागिरी शहर, अभाविप गोगटे–जोगळेकर महाविद्यालय युनिट आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘मिशन साहसी’ अंतर्गत विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण व तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमास एसआरके तायक्वांदो क्लब रत्नागिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरास महिला विकास कक्षाच्या समन्वयिका प्रा. डॉ. सोनाली कदम यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. रत्नागिरी शहरातील तब्बल ७२ विद्यार्थिनींनी या शिबिरात उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि स्वसंरक्षणाचे आवश्यक तंत्र आत्मसात केले.
शिबिरामध्ये एसआरके तायक्वांदो क्लबतर्फे राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी प्रशिक्षण दिले. श्रुती चव्हाण, मृदुला पाटील, सान्वी मयेकर, समर्था बने, सुजल सोळुंके, वेदांत चव्हाण, पार्थ गावडे आणि देवन सुपल या खेळाडूंनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षण आणि तायक्वांदोचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
आजच्या काळात विद्यार्थिनी सक्षम आणि सुरक्षित असाव्यात या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य वाढीस लागला असून संकटसमयी योग्य पद्धतीने स्वतःचे रक्षण करण्याची तयारी त्यांच्यात निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आयोजकांनी यावेळी केले.
राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याचा वारसा जपत, विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हे ‘मिशन साहसी’ प्रशिक्षण शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरले.