रत्नागिरीत सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रा
माय भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने
रत्नागिरी. : जिल्हा प्रशासन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग (माध्य.), राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “सरदार@150 युनिटी मार्च”आणि “विकसित भारत पदयात्रा” आज काढण्यात आली. शहरातील वैद्यकीय महाविद्यालय, आर.पी. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, दामले विद्यालय, देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नवनिर्माण शिक्षण संस्था, जिल्हा विधी प्राधिकरण, रा. भा. शिर्के प्रशाला, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, ए. डी. नाईक हायस्कूल, नाईक स्कूल, अ. के. देसाई हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उद्यमनगर कॉन्व्हेन्ट हायस्कूल चे विद्यार्थी एन. एस. एस तसेच एन.सी.सी. कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त एकता पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून सुरुवात करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून, एकता पदयात्रेचे उद्दिष्ट सांगितले. राष्ट्रीय एकतेच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकता पदयात्रेचे आयोजन केले आहे, असे ते म्हणाले.
तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावना निर्माण करणे, या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य, अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकसंध भारताच्या विचारांना स्मरून एकात्म भारताच्या निर्मितीचा संकल्प या माध्यमातून घेतला जाणार आहे, हा या युनिटी मार्चचा उद्देश आहे.
यानंतर सचिव श्री. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून युनिटी मार्चला सुरुवात झाली. स्टेडिअम ते जयस्तंभ मार्गे, मारुती मंदिर या मार्गावरुन ही पदयात्रा काढण्यात आली. पुन्हा स्टेडिअम येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार राजाराम म्हात्रे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण अधिकारी अमित पुंडे यांनी व आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांनी केले.

