महाविकास आघाडीला मोठा धक्का
काँग्रेस-राष्ट्रवादी(शरद पवार गट) स्वतंत्र लढणार
रत्नागिरी:
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून स्थानिक शिवसेना (उबाठा) नेत्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, आघाडीतून बाहेर पडलेले हे दोन्ही पक्ष आता रत्नागिरी शहरात एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्मुला ठरला होता आणि त्यानुसार सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले होते. मात्र, जागावाटप निश्चित होऊनही शिवसेनेच्या (उबाठा) स्थानिक नेतृत्वाने काही ठिकाणी मित्रपक्षातील उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले होते.
या उमेदवारांनी निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीला (आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबर) आपले अर्ज मागे घ्यावेत, असा स्पष्ट शब्द उबाठाकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आला होता.
दिलेला शब्द फिरवला
आज अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींवर लक्ष ठेवून होते. मात्र, अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही शिवसेनेच्या (उबाठा) स्थानिक नेतृत्वाने दिलेला शब्द पाळला नाही आणि या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तात्काळ कठोर भूमिका घेत महाविकास आघाडीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश किर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. “आम्हाला शिवसेनेच्या (उबाठा) स्थानिक नेतृत्वाने दिलेला शब्द फिरवला आहे. दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे आम्ही रत्नागिरीतील महाविकास आघाडीत यापुढे सामील होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. किर पुढे म्हणाले की, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत ही नगरपरिषद निवडणूक लढवणार आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, आता महाविकास आघाडीमध्ये केवळ शिवसेना (उबाठा) आणि इतर काही मित्रपक्ष शिल्लक राहिले आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता ही नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळतील.