शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या ४ संशयितांना शस्त्र-वाहनासह वनविभागाने पकडले
संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करत शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार संशयित आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडून बोलेरो पिकअप वाहन, बंदूक, जिवंत काडतुसे आणि टॉर्च असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०६/११/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजता वनविभागाचे पथक गस्त घालत असताना, मौजे-राजवाडी (ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर, ता. संगमेश्वर) येथे अणदेरी ते राजवाडी मार्गावर बोलेरो पिकअप क्र. MH-०८ AP- ८६२१ हे वाहन संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. वाहनाच्या टपावर बसून काही इसम हॅंड टॉर्चचा लाईट शिकारीच्या उद्देशाने फिरवत होते.
वनविभागाच्या पथकाने हे वाहन थांबवून त्याची झडती घेतली असता, वाहनामध्ये एकूण ०४ संशयित इसम आढळून आले. तसेच, त्यांच्याजवळ १२ बोअर बंदूक ०१, जिवंत काडतुसे ०६, आणि हॅंड टॉर्च ०२ इ. मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल गाडीसह जप्त करण्यात आला असून, चारही आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
विश्वनाथ शांताराम मालप (वय २९, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (वय ४३, रा. हेदली, ता संगमेश्वर), रुपेश धोंडु पोमेंडकर (वय ४१, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर), राहुल रविंद्र गुरव (वय २८, रा. तिवरे घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर) या आरोपींना अटक करण्यात आले आहे.
सदर घटनेचा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आवश्यक कागदपत्रे तयार करून पुढील तपास सुरू आहे. सदरची महत्त्वपूर्ण कारवाई माननीय मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर श्री. जी. गुरुप्रसाद सर (भा.व.से) आणि माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी-चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कार्यवाहीमध्ये श्री. प्रकाश सुतार (परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी), श्री. सागर गोसावी (वनपाल, संगमेश्वर-देवरुख), वनरक्षक श्री. सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी सहभाग घेतला. या कारवाईसाठी पोलीस पाटील अणदेरी महेंद्र होडे, पोलीस पाटील राजवाडी विलास राऊत, सुलतान मालगुंडकर आणि अनंत तोरस्कर यांचेही सहकार्य लाभले.
विभागीय वन अधिकारी रत्नागिरी, श्रीमती गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असल्यास, त्वरित वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.