जिल्ह्यातील प्रश्न, समस्या अडचणींचा मी स्वतः पाठपुरावा करणार – खा. राणे
जनता दरबारात 105 जणांकडून समस्यांबाबत अर्ज
रत्नागिरी
प्रश्न, समस्या अडचणी समजून घेण्यासाठीच मी आलो असून त्यांचा स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित जनता दरबारात 105 जणांनी समस्यांबाबतचे अर्ज सादर केले होते. अर्जदारांच्या भेटीनंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीबरोबरच लांजा, राजापूर व संगमेश्वर येथूनही अनेक अर्जदार आपल्या तक्रारी व समस्या घेऊन आले होते. यावेळी खा. राणे यांच्यासह लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपाचे नेते प्रशांत यादव, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, युवाचे जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. राणे म्हणाले की, हा जनता दरबार जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आला असून यामध्ये राजकीय हेवेदावे आणू नयेत असे सांगत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान पिळले. आलेल्या समस्या, तक्रारी यांचा निपटारा पंधरा दिवसात काढला जाईल, त्यासाठी आपण स्वत: याचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता व प्रशासनामधील दुवा म्हणून आपण काम करीत आहोत. गरजू लोक प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे अर्ज घेऊन येत असतात. त्यावेळी अनेकजण वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे सांगून मोकळे होतात. परंतु वरिष्ठांकडे पाठवलेल्या अर्जाचे काय झाले, हे सांगता आले पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांनीही काही कालावधीनंतर त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे अशा स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. कायद्याने होणाऱ्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे वाक्य आहे मोठा होणे सोपे आहे पण मोठेपण टिकवणे कठीण आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत खा. राणे यांनी बोलून दाखवले.
पोलीस दलाबाबत लांजातील चोऱ्या, आरजू कंपनीबाबत तक्रारी आल्याने यावर आरोपींना तातडीने अटक करा अशा सूचनाही खा. राणे यांनी पोलीस दलाला दिल्या. अशा घटनांबाबत कुणाचाही दबाव घेऊ नका अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी एसटी विभागाशी संबंधित तीन ते चार अर्ज आल्याने त्यांनी विभाग नियंत्रणकांना तातडीने बोलावून घेतले. एसटीतील बदली, 25 वर्ष होऊनही निवृत्ती वेतनातील फरक मिळत नसल्याने एका निवृत्त कर्मचाऱ्यांने जनता दरबारात धाव घेतली होती. गेली पन्नास वर्ष सुरु असलेली रत्नागिरी-पणजी बस सेवा पुन्हा सुरु करण्याबाबतचे निवेदनही देण्यात आले.
दीड-दोन वर्ष उलटूनही महावितरण शेतीपंपासाठी कनेक्शन देत नसल्याची तक्रारही करण्यात आली. त्याचप्रमाणे कोर्टात जमीन वाटप आदेश होऊनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार करण्यात आली. यावर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना खा. राणे यांनी प्रांताधिकरी देसाई यांना दिल्या. रस्त्यात बांध घालून तो मार्ग अडवल्याबाबत तक्रार देऊन दिडशे दिवस उलटूनही प्रशासन काहीच करीत नसल्याची समस्याही खा. राणेसमोर ठेवण्यात आली.
यावेळी ग्राहक पंचायतीतर्फे महावितरणच्या कारभाराचा नमुनाही खा. राणे यांच्यासमोर सादर करण्यात आला. महावितरण 772 ग्राहकांचे तब्बल 2 कोटी 40 लाखाहून अधिकची रक्कम देत नसल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी पंपासाठी विक्रीकर निरंक असतानाही तो अवैधपणे वसुल करण्यात आल्याची बाब खा. राणे यांच्या लक्षात आणून देण्यात आली. या प्रकरणात आपण स्वत: लक्ष घालून वरिष्ठांशी चर्चा करु असे त्यांनी सांगितले. सामाजिक मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल खा. राणे यांनी ग्राहक पंचायत सदस्यांचे आभार मानले. जैतापूर येथील श्रमिक पतपेढीच्या चोरीप्रकरणात ओरिएंटल इंशुरन्सकडून दोन कोटीचा विमा अद्याप मिळाला नसल्याची तक्रारही यावेळी पतपेढीकडून करण्यात आली. यासाठी बंधारे, रस्ते, साकव, मोबाईल टॉवरची मागणी, रेल्वेलाईन डबल करणे,यासह अनेक कामे होण्यासाठी यादीच खा. राणे यांना देण्यात आली.