उपचारासाठी कामथेहून डेरवणला नेत असताना ३६ वर्षीय महिलेचा वाटेतच मृत्यू
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे एका ३६ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊन छातीत दुखू लागल्यामुळे तिला उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी तिला डेरवण येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत महिलेचे नाव अनुजा रुपेश डेरे (वय ३६, रा. सावर्डे, कोष्टीवाडी, ता. चिपळूण) असे आहे. या घटनेची खबर मृत महिलेचा मुलगा आर्यन रुपेश डेरे याने सावर्डे पोलीस ठाण्यात दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनजा डेरे यांना मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक त्रास जाणवू लागला, त्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार करून घरी आणले होते. मात्र, त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना पुन्हा अचानक दम लागणे आणि छातीत दुखणे सुरू झाले.
परिणामी, नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, बुधवारी, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून त्यांना पुढील विशेष उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, अनुजा डेरे यांना रुग्णवाहिकेतून डेरवण हॉस्पिटलकडे नेत असताना, सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी कामथे ते डेरवण या दरम्यान रुग्णवाहिकेतच त्यांची प्रकृती अधिक खालावली. डेरवण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतच त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा रुग्णवाहिकेतून कामथे हॉस्पिटलमध्ये आणला.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात सुरुवातीला अ.मृ.क्र. ००/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे दाखल करण्यात आली होती. नंतर चिपळूण पोलीस ठाणे जा.क्र. १२०५२/२०२५ दि. २९/१०/२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ही कागदपत्रे सावर्डे पोलीस ठाणे आ.क्र. १५११/२०२५ दि. २९/१०/२०२५ अन्वये दाखल करण्यात आली आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आ.मृ. क्र. २५/२०२५, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.