दूषित पाण्यामुळे वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच
चिपळूण : दीपावलीच्या सणातच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी वाहून नेणारी जलवाहिनी कोतवली गावाजवळ फुटल्याने वाशिष्ठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रक्रिया न केलेले दूषित पाणी थेट नदीत मिसळल्याने हा प्रकार घडला असून, यामुळे मच्छीमार आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून नदीत सोडले जाणे अपेक्षित असते. मात्र, दीपावलीच्या सुट्टीचा गैरफायदा घेत काही कारखान्यांनी जलशुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच दूषित पाणी थेट वाशिष्ठी नदीत सोडल्याचा गंभीर आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. परिणामी, दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने हे विषारी पाणी कोतवली गावाजवळच्या नदीपात्रात मिसळले आणि मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले.
या घटनेमुळे नदीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्वरित जलवाहिनी दुरुस्त करण्याची आणि माशांच्या मृत्यूमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, जोपर्यंत पंचनामा होत नाही, तोपर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
या गंभीर प्रकारानंतर एमआयडीसीच्या ठेकेदार आणि डेप्युटी इंजिनिअर आर. जी. कुळकर्णी यांच्या उपस्थितीत येत्या २७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोतवली ग्रामपंचायत कार्यालयात एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलशुद्धीकरण केंद्राचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे आणि पुन्हा दूषित पाणी नदीत कसे पोहोचले, याची शहानिशा या बैठकीत केली जाणार आहे. “दूषित पाणी वाहून नेणारी जलवाहिनी तत्काळ दुरुस्त करावी आणि मच्छीमारांच्या नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी आम्ही संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून केली आहे,” अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी दिली.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकाराने औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या संयुक्त बैठकीत काय निर्णय घेतला जातो आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे खेड तालुक्यातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.