हर्णे बीचवर कार स्टंटबाजी करणाऱ्या पुणेकर तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे चारचाकी गाडी चालवून स्टंटबाजी करणाऱ्या एका पुणे येथील तरुणावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हर्णे बीचवर घडला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भुवरी येथे राहणारा प्रतीक उद्धव दळवी (वय १९) हा तरुण आपली स्विफ्ट कंपनीची काळ्या रंगाची चारचाकी गाडी (क्र. एम.एच १२ डब्ल्यु.टी-१०२६) घेऊन हर्णे बीचवर आला होता.
प्रतीक दळवी याने समुद्राच्या किनाऱ्यालगत सार्वजनिक बीचवर आपले वाहन अत्यंत बेदरकारपणे, निष्काळजीपणे व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा धोकादायक पद्धतीने चालवले. त्याने गाडी गोल-गोल फिरवून (ड्रिफ्टिंग) स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. हर्णे बीचवर सकाळच्या वेळी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक उपस्थित असतात. या गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारे स्टंटबाजी करणे हे अत्यंत धोकादायक कृत्य होते.
या गंभीर प्रकाराची नोंद घेत दापोली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंकज फलचंद पवार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, प्रतीक उद्धव दळवी याच्यावर २५ ऑक्टोबर २०२५ रोजी १६.२४ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.आर.क्र. १९६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५ आणि २८१ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत या घटनेतून पोलिसांनी दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.