जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी गस्त
पोलिस अॅक्शन मोडवर ; मिरकरवाडा, तारांगणातही तपासणी
रत्नागिरी : दिवाळीच्या सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आणि किनाऱ्यावरील हुल्लडबाजी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किनाऱ्यावर पोलिस गस्त सुरू ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी शहरातील काही ठिकाणी आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिरकरवाडा आणि तारांगण परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथकाद्वारे गस्त घालण्यात आली. या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर कारवाई केली आणि मिरकरवाडा येथील अनेकांची चौकशी केली.

जिल्हा पोलिस सध्या अॅक्शनमोडवर आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. देवदर्शनानंतर अथांग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. वॉटरस्पोर्ट, उंटसवारी, बाईकसवारी तसेच पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. यामध्ये अनेक अतिउत्साही तरुण स्टंट करून अन्य पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहेत तसेच ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. याबाबतच्या तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व सागरीकिनाऱ्यावर पोलिसांनी गस्त सुरू ठेवली आहे. दापोली किनाऱ्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी सुरू असल्याचा प्रकार नुकताच पुढे आला. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीने पर्यटक सुरक्षित पर्यटन करतील, अशी पोलिसांची धारणा आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व किनाऱ्यांवर पोलिस गस्त सुरू ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा आणि तारांगण परिसरामध्ये काही तरुण टोळक्याने मद्यपान करतात किंवा उशिरापर्यंत बसलेले असतात, अशा तक्रारी होत्या. त्यानुसार काल अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरकरवाडा जेटी व तारांगण परिसर या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकचे ३० अंमलदार व रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे २ अधिकारी, ७ कर्मचारी यांच्यासह पायी गस्त घालण्यात आली. मिरकरवाडा येथे एक व्यक्ती अंधारामध्ये उघड्यावर दारू पिताना आढळल्याने त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. जेटी परिसरात संशयित व्यक्तींकडे विचारपूस करण्यात आली. त्यांची ओळखप तपासणी करण्यात आली.