हर्णै येथे आढळला मृत डॉल्फिन
भरतीने वाहून आला; पोटाच्या खालच्या बाजूस जखम
दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर एक भारतीय हम्पबॅक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला आहे. शनिवारी सकाळी समुद्राच्या भरतीने वाहून तो किनाऱ्यावर आला. येथील स्थानिकाना दिसून येताच त्यांनी वनविभाग व कांदळवन विभागाला त्याची माहिती दिली. संध्याकाळी उशिरापर्यंत कोणीही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
मृत डॉल्फिन सुमारे २.२ मीटर लांब असून, त्याच्या शरीरावर पोटाच्या खालच्या बाजूस खोल जखम दिसत आहे. मृत डॉल्फिन हा आय लव्ह हर्णे या सेल्फी पॉइंटच्या समोरील किनारपट्टीला दिसून आला आहे. डॉल्फिन हा जाळ्यात अडकून किंवा मोठ्या नौकांच्या फॅनचा धक्का लागून जखम झाली असावी किंवा समुद्रातील प्रदूषणामुळेदेखील या डॉल्फिनचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज येथील स्थानिकांनी लावला.
या मृत डॉल्फिनची त्वचा राखाडी रंगाची असून, पाठीवर थोडासा उभार दिसत आहे. भारतीय हम्पबॅक डॉल्फिन ही या मृत डॉल्फिनची जात आहे. ही जात भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूचीमधील प्रजाती असून, तिला वाघा-सिंहाइतकीच कायदेशीर सुरक्षा दिली आहे. ही जात मुख्यतः भारत, श्रीलंका, पाकिस्तान, ओमान आणि पूर्व आफ्रिका किनारपट्टीवर आढळते. महाराष्ट्रात हर्णै, दाभोळ, आंजर्ले, मालवण, श्रीवर्धन या किनारी भागांत या जातीच्या हे डॉल्फिन्स नियमितपणे दिसतात.
सागरकिनाऱ्यावरील विकासकामे, जलप्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि मासेमारी जाळ्यांमुळे या प्रजातीच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. हौँ किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळल्याने स्थानिक मच्छीमार व पर्यावरणप्रेमींत हळहळ व्यक्त होत आहे.