अल्पवयीन दुचाकीस्वारांना पोलिसांचा इंगा
राजापूर
शहरातील अल्पवयीन शाळकरी दुचाकीस्वारांना राजापूर पोलिसांनी चांगलाच इंगा दाखविला आहे. मंगळवारी अशा तब्बल २७ शाळकरी विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी नऊ प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या अल्पवयीन पाल्यांना दुचाकी देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शाळा, महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी विनापरवाना वाहने आणत असल्याबद्दल आणि ती भरधाव, बेदरकारपणे चालवून इतरांना त्रास देत असल्याबद्दल राजापूर पोलीस ठाण्यात महाविद्यालयाकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार पोलिसांनी कठोर भूमिका घेत मंगळवारी धडक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाहतूक अंमलदार दीपक करजवकर आणि नितीन फाळके यांनी तब्बल २७ विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तसेच नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांसाठी आता पालकांनाही जबाबदार घरले जात असल्याचे पालकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने चालवण्यास देत असताना त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे की नाही, याची खात्री करावी. त्याचप्रमाणे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आणि महाविद्यालयाच्या आवारात एका दिवसात तब्बल २७विद्यार्थ्यांवर कारवाई अत्यंत शिस्तबद्ध व व्यवस्थितरित्या वाहने चालवावीत, जेणेकरून इतरांना कोणताही त्रास होणार नाही किंवा कोणाचा जीव धोक्यात येणार नाही, याची समजही पालकांनी आपल्या मुलांना द्यावी. भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास पोलीस प्रशासन अधिक कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.