नारंगी नदीपात्रात पिशवीत आढळला जनावरांचा मृतदेह
खेड: खेड-खारी मार्गावरील देवणे पुलाखाली नारंगी नदीपात्रात एका मोठ्या बंद पिशवीतून रक्त वाहत असल्याचे दृश्य काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्या पिशवीत नक्की काय आहे, असा प्रश्न पडला होता. मात्र, पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्या पिशवीत जनावरांचा मृतदेह होता.
खेड-खारी मार्गावरील देवणे पुलाखाली नारंगी नदीपात्रात बंद पिशवी आढळल्यानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. ही माहिती मिळताच खेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन अहिरे सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सावधगिरीने पिशवी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये रेडकू मृत अवस्थेत आढळून आले. प्राथमिक चौकशीत समजले की, त्या मृत जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी कोणी तरी त्याला पिशवीत भरून नदीपात्रात टाकले होते. वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी जमलेले नागरिक शांतपणे निघून गेले. या संपूर्ण घटनेनंतर खेडचे पोलिस निरीक्षक सचिन अहिरे यांनी स्पष्ट केले की, ‘या प्रकरणात कोणताही अनुचित प्रकार नाही. कोणीही अफवा पसरवू नये.’ दरम्यान नारंगी नदीपात्रात देवणे पुलाखाली पोत्यामध्ये बांधलेल्या त्या मृत रेडकाचे अवशेष शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात्-नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.