बुद्ध विहाराच्या जागेवरील आरक्षण रद्द
समाजबांधव रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार
रत्नागिरी : थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या जमिनीवरील आरक्षण उठविल्याच्या निर्णयानंतर रत्नागिरीतील बौद्ध समाजात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर थिबा राजा कालीन बुद्ध विहार संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (५ ऑक्टोबर) एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक बौद्ध समाजाच्या गाव शाखेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या शासकीय बंगल्याशेजारी असलेल्या बुद्ध विहाराच्या जागेवरील आरक्षण रद्द झाल्याने संतप्त झालेल्या समाजबांधवांनी आगामी आंदोलनाची रूपरेषा आखली आहे.

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही जागा बौद्ध समाजासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, जमीन समाजाच्या ताब्यात द्यावी यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठराव करून आंदोलनाची तयारी करण्याचे ठरविले. मोर्चासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.