महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंतीगेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२५: वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजार ३४० वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून सोमवार (दि. ६) पर्यंत लघुदाब वर्गवारीतील पर्यावरणस्नेही ७ लाख ६ हजार ९२४ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे व त्यांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन योजनेतील वीजग्राहकांचा वाढता प्रतिसाद सहभाग स्वागतार्ह आहे. त्यांना वीजबिल डिजिटल स्वरुपात पाठवले जात आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे’, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.
गेल्या तीन महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग – वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. विशेष म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २ लाख ३ हजार ३४० ग्राहकांची या योजनेत भर पडली आहे. यात सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील ८७ हजार ४० ग्राहकांचा तर कोकण प्रादेशिक विभागातील ७८ हजार ८२९ ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेत आतापर्यंत ७ लाख ६ हजार ९२४ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक २ लाख ८८ हजार २३८ (३.४६ कोटी), कोकण- २ लाख ६२ हजार २३७ (३.१५ कोटी), नागपूर प्रादेशिक विभाग- ८४ हजार ५३१ (१.०१ कोटी) आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये योजनेत सहभागी ७१ हजार ९१८ वीजग्राहकांना ८६ लाख ३० हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
असे व्हा योजनेत सहभागी – गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.
वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.