लांजा येथील ४९ वर्षीय कावीळग्रस्त रुग्णाचा मृत्यू
लांजा: लांजा तालुक्यातील एका ४९ वर्षीय व्यक्तीचा कावीळ आणि तापामुळे प्रकृती गंभीर झाल्यानंतर रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आत्माराम लोहार (वय ४९), रा. झापडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी, यांना २६ सप्टेंबर २०२५ पासून ताप येत होता. त्यांच्यावर लांजा येथील डॉ. अशोक पाटील यांच्याकडे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २९ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. पाटील यांनी संतोष लोहार यांना कावीळ झाल्याचे निदान केले.
मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आणि कावीळ जास्त झाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास लांजा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले.
लांजा येथील प्राथमिक उपचारानंतर, अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता १०८ ॲम्ब्युलन्सने तातडीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना, त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची नोंद ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांनी लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू क्रमांक ५७/२०२५ आणि बी.एन.एस.एस. (भारतीय न्याय संहिता) कलम १९४ प्रमाणे नोंद करून घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.