शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी आज उबाठाकडून चक्काजाम आंदोलन
रत्नागिरी
: सर्वांत मोठा गणेशोत्सव शहरातील खड्ड्यामधुनच झाला. नवरात्रोत्सव तसा गेला, खड्ड्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. खड्ड्यांमुळे अगदी दुचाकी ते मोठ्या वाहनांपासून सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. या खड्ड्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी सर्व वाहनधारकांनी ज्यांना वाटते आहे की शहरातील रस्ते चांगले व्हावे, त्यांनी शनिवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तुम्ही जिथे आहे तिथे ५ मिनिटे थांबुन शहरात चक्काजाम करा. खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला जाग आणण्यासाठी स्वयंस्पुर्तीने नागरिकांनी सहभागी व्हा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकेर शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी
केले.
मी पालकमंत्री उदय सामंत यांना आव्हान देतो की, तुम्ही लोकप्रिय आहेत आम्ही अलोकप्रिय आहे. मग तुम्ही विमानातून फिरण्यापेक्षा रत्नागिरीतील रस्त्यातून फिरून दाखवावे आपले नाकर्तुत्व सर्वांच्यालक्षात येईल, असे आव्हानही त्यांनी दिले.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युद्यनगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी
शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपशहर प्रमुख प्रसाद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बाळ माने म्हणाले, शहरात खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. छोट्या वाहनांपासून ते मोठ्या वाहनांचे खड्ड्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरीभागात रस्ते झाले की किमान दोन वर्षांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला ग्रामीण भागात रस्त्याचे काम केले तर ५ वर्षे देखभाल दुरूस्तीची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे. परंतु रत्नागिरीत वेगळेच चित्र आहे. आता कॉंक्रिटीकरणाचे रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरण आणि कॉंक्रिटिकरणाची स्वेतपत्रिका काढण्याची मागणी आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे करणार आहे.
शहारतील बहुतांशी रस्त्यांच्या कामाचा ठेका सामंत कंपनीकडे आहे. या कामातून पैसे मिळवायचे आणि निवडणुकीला वापरायचे असे षड्यंत्र आहे. त्यामुळे दर्जाहिन काम करणाऱ्या अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी करणार आहे. १० तारखेपर्यंत परतीचा पाऊस संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वी जर शहरातील रस्ते गुळगुळीत झाले नाही, तर उबाठा सेना तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा बाळ माने यांनी दिला.