परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 21 लाखांची फसवणूक
रत्नागिरी ः
परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल 21 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 सप्टेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत किर्तीनगर येथे घडली आहे.
याबाबत आयेशाबी इमरान टेमकर (32,रा.किर्तीनगर उर्दु मिडियम स्कुलजवळ,रत्नागिरी) यांनी बुधवार 1 ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिलेने फिर्यादी आयेशाबी टेमकर यांच्या भावाला आणि त्यांच्या नात्यातील व ओळखीतील मुलांना परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तिने आयेशाबी यांच्याकडून स्वतः तसेच तिची भाची व बहिण यांच्यामार्फत रोख व ऑनलाईन रक्कम स्विकारली. त्याचप्रमाणे संशयित महिलेच्या सांगण्यावरुन दोन वेळा मेंगलोर व एक वेळ केरळ येथे 20 मुलांना घेउन जाण्याचा खर्च तसेच फिर्यादी महिलेचे पती कुवेतवरुन केरळला आल्याचा खर्च अशाप्रकारे एकूण 21 लाख 2 हजार 256 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.