अपहरणप्रकरणी आणखी एका संशयितास अटक
देवरुखातील व्यापारी अपहरण प्रकरण; आरोपींची संख्या ७ वर
देवरुख
शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरणप्रकरणी देवरुख पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरत सोमवारी रात्री ठाणे बदलापूर येवून आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून सोन्याची लगड व ४ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या ७ झाली आहे. देवरुख पोलिसांच्या धडक कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
देवरुख येथे सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर हे चारचाकी वाहनाने १७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास साखरपाहून देवरुखच्या दिशेने परतत असताना वांझोळे येथे अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यांच्याकडील १४ लाखाचे दागिने व २० हजार रुपये रक्कम काढून घेत त्यांना वाटूळ येथे सोडले. केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञातांवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्पावधीतच सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोने विकून घेतली रोख रक्कम
दरम्यान पोलीस पथकाने सोमवारी बदलापूर येथून आणखी एका आरोपीला ताब्यात घेत अटक केले. या आरोपीने अपहरणातील सोने विकून त्याची रोख रक्कम घेतली होती. या आरोपीच्या मुसक्या आवळण्याबरोबर सोन्याची लगड व ४ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,
अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले होते. या पथकामध्ये उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, प्रशांत मसुरकर, सचिन पवार, संदीप जाधव, अमर घाडी यांचा समावेश होता.
अखेर पितळ उघडे
स्थानिक आरोपींनी केतकर यांच्यावर करडी नजर ठेवली होती. त्यानंतर बदलापूर येथील आरोपींच्या मदतीने केतकर यांचे अपहरण केल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिकांना हा डावपेच पचेल असे वाटले होते. मात्र हळूहळू सर्वांचे पितळ उघडे होत आहे. बदलापूर येथील अरोपींबर यापूर्वी विविध प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.