‘टीडब्ल्यूजे’च्या चिपळूण शाखेचा पंचनामा
इमारत इंटकने घेतली ताब्यात; कारवाई सुरू
चिपळूण: टीडब्ल्यूजे कंपनीने संपूर्ण राज्यातच अनेकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधीचा गंडा घातला आहे.
चिपळूण पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आता पोलिस कारवाईसाठी सक्रिय झाले असून, मंगळवारी सकाळी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चिपळूणमध्ये येऊन गुहागर बायपास येथील कंपनीच्या चिपळूण शाखेचा पंचनामा केला. त्यामुळे या तपासाला वेग आला आहे.
टीडब्ल्यूचे सीएमडी समीर नार्वेकर, संचालक नेहा नार्वेकर, चिपळूण व्यवस्थापक सिद्धेश कदम, संकेश घाग या चौघांविरोधात २९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कामथे येथील प्रतीक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार टीडब्ल्यूजेवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे.
चिपळूण, यवतमाळ येथे गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. ही शाखा इंटक संघटनेच्या मालकीच्या जागेत भाड्याने चालवण्यात येत होती. मात्र, कंपनीने या कार्यालयास कार्पोरेट लुक दिला होता. ठेवीदारांचे पैसे थकल्याचे लक्षात येताच इंटक संघटनेने महिनाभरापूर्वीच टीडब्ल्यूजेच्या कार्यालयास टाळे लावून त्याचा ताबा घेतला होता. या पंचनाम्यातून पोलिसांनी कोणती माहिती मिळाली, याचा मात्र उलगडा झाला नाही.