कुरतडेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध समित्यांची स्थापना
रत्नागिरी– रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावात नुकतीच एक विशेष ग्रामसभा कुरतडे ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सौ. प्रतिक्षा गुरुनाथ पालवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगर येथे सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’च्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत गावाच्या विकासासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेची सुरुवात ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रतिक्षा पालवकर, उपसरपंच श्री. सुरज जाधव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. ग्रामपंचायत अधिकारी सरस्वती मोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या अभियानाचा उद्देश गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम बनवणे, गावाचा सर्वांगीण विकास करणे आणि लोकसहभाग वाढवणे हा आहे. त्यानुसार, विशेष ग्रामसभेत सखोल चर्चा करून खालीलप्रमाणे ग्रामस्तरीय समित्यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व गाव पातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी,सदस्य व ग्रामस्थ यांचा समावेश करून सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध्द, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे इत्यादी समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यावेळी संपर्क प्रमुख डॉक्टर कोलगे उपस्थित होते.
ग्रामसभेत महसूल विभागाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा झाली. यामध्ये पाणंद रस्ते आणि नमुना नं. २३ मध्ये नमूद असलेल्या पायवाटा व रस्त्यांची महसूल अभिलेखात नोंदणी करण्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे गावातील रस्ते आणि पायवाटांची योग्य नोंदणी होण्यास मदत होईल.
या विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, गाव पातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.