दुचाकी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा
रत्नागिरी, ता. ७ ः तालुक्यातील खालगाव-जाकादेवी, पोचरी फाटा येथून दुचाकी चोरुन नेल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराज प्रसाद सावंत व राजेंद्र राजन शिर्के (दोन्ही रा. मांजरे देसाईवाडी, ता. संगमेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३) सकाळी सात ते साडेबाराच्या या कालावधीत खालगाव जाकादेवी पोचरी फाटा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रघुनाथ सखाराम गोताड (वय ७१ रा. खालगाव, जाकादेवी पोचरी फाटा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयितांनी वृद्ध गोताड यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र. एमएच-०८ एल २७७९) ही त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित श्रीराज सावंत व राजेंद्र शिर्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.
निवळी-बावनदी अपघात प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी-बावनदी उतारात कंटेनर निष्काळजी चालवून स्वतःच्या मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या कंटेनर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष जगतपाल वर्मा (वय २३, रा. बंन्डा, खुटार, छातरपुर, प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निवळी-बावनदी सुतारवाडी, येथील उतारातील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कंटेनर (क्र. एमएच-४६ बीबी १५३७) वरिल चालक मृत सुभाष वर्मा याने कंटेनर निष्काळजीपणे चालविल्यामुळे उलटला या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तसेच वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस पाटील सौ. संजना संजय पवार (वय ४१, रा. निवळी कोकजे वठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी संशयित कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चांदेराई मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील चांदेराई-तेलीवाडी रस्त्यात रिक्षा आडवी करुन ठेवल्याने रिक्षा काढण्यासाठी हॉर्न वाजविल्याच्या रागातून व पुर्ववैमन्स्यातून मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर सुरेश आंब्रे (वय ४५), अमित सुरेश आंब्रे (वय ४२) व एक महिला (सर्व रा. तेलीवाडी-चांदेराई, रत्नागिरी) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी आठच्या सुमारास चांदेराई-तेलीवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद प्रमोद आंब्रे (वय ५०, रा. तेलीवाडी-चांदेराई, रत्नागिरी) हे चांदेराई बाजारात गेले होते. बाजारहाट संपवून घरी जात असताना वाडीत जाणाऱ्या रस्त्यामध्ये संशयित समिर आंब्रे यांची रिक्षा रस्त्यात आडवी होती म्हणून त्यांनी हॉर्न वाजविला. आवाज ऐकून फिर्यादी यांची आई हिने अंगणात येवून काय झाले या बाबत विचारणा केली असता संशयित समिर यांनी पुर्वी जमिनीच्या वाद लक्षात घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी हे सोडवायला गेले संशयित अमित आंब्रे याने हातातील लाकडी दांडा फिर्यादी विनोद आंब्रे यांच्या चेहऱ्यावर मारला तो त्यांच्या डोळ्याला नाकाला लागला. फिर्यादी खाली पडले. या मारहाणीत फिर्यादी यांची पत्नी व मुलगी यांना देखील संशयितांना मारहाण करुन शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विनोद आब्रे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पादचारी वृद्धाला धडक ; अज्ञात स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील दांडेआडोम-भावेआडम वरुन कोतवडे जाणाऱ्या रस्त्यावर पादचाऱ्याला ठोकर देवून जखमी अवस्थेत टाकून पलायन करणाऱ्या अज्ञात स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास दांडेआडम ते कोतवडे जाणाऱ्या रस्त्यावर भावे आडम पासून २०० किलोमिटर अंतरावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रवींद्र कृष्णा मोरे (वय ४५, रा. दांडेआडोम-मांडवकरवाडी, रत्नागिरी) यांचे वृद्ध वडिल श्रीकृष्ण सोनू मोरे (वय ६५) हे दांडेआडम ते कोतवडे जाणाऱ्या रस्त्याने शेतावर जात असताना ग्रुपग्रामपंचायत दांडेआडम-भावेआडम पासून दोनशे मिटर अंतरावर कोतवडे दिशेने जाणाऱ्या स्वाराने त्यांना धडक दिली व पलायन केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रवींद्र मोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.