खंडाळा हत्याकांडातील आरोपी दुर्वास पाटीलचा ‘सायली’ बार अखेर सील
रत्नागिरी : जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे.
मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्ती गरोदर राहिली आणि तिने दुर्वासकडे लग्नासाठी तगादा लावला. दुर्वासने तिला फोन करून खंडाळा येथे त्याच्या मालकीच्या ‘सायली देशी बार’ मध्ये बोलावले.
दुर्वास आणि विश्वास यांनी बारच्या वरच्या खोलीत भक्तीचा केबलने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुशांत नरळकर याच्या वॅगनआर गाडीतून मृतदेह आंब्याघाटात नेण्यात आला आणि घाटाच्या निर्जन भागात फेकून देण्यात आला.
तसेच याच बारमध्ये २९ एप्रिल २०२४ रोजी दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी कळझोंडी येथील रहिवासी सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५) यांची निर्घृण हत्या केली होती. वीर हे आरोपी दुर्वास पाटीलच्या मैत्रिणीला वारंवार फोन करून त्रास देत होते. याच रागातून आरोपी दुर्वास दर्शन पाटील (२८), विश्वास विजय पवार (४१), आणि राकेश अशोक जंगम (२८) यांनी संगनमत करून सीताराम वीर यांना हाताने आणि काठीने बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर तिन्ही आरोपींनी वीर यांना चक्कर आल्याचे कारण सांगून रिक्षाने त्यांच्या घरी पाठवले. मात्र, घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी आरोपींनी इतर कामगारांनाही धमकी दिली होती. पोलीस विभागाच्या अहवालानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.