ई – पीक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी अनिवार्य : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी:- ई – पिक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक काढणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असून, ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांनी प्रत्येक गावात कॅम्प आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह महसूल, कृषि व ग्रामविकास विभागाचे जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी ॲग्रीस्टॅक व इतर योजनांचा सखोल आढावा घेतला. त्या अनुषंगाने पुढील आठ ते दहा दिवसात पूर्ण जिल्ह्यामध्ये कॅम्पचे आयोजन करणेबाबत मार्गदर्शन केले. या सोबतच खरीप हंगामातील पिकांची ई – पिक पाहणी नोंद 15 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ( डीसीएस- डिजिटल क्रॉप सर्वे ) अप्लिकेशन चा वापर करून आपल्या क्षेत्राची नोंदणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारमार्फत जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते या पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागास संपर्क साधावा किंवा सीएससी धारकांकडून जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करावा. ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत ग्राम स्तरावरील संबधित यंत्रणा तसेच लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक ( Farmer ID ) कॅम्पच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे.