इंधन तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कंपन्यांना लेखी सूचना
रत्नागिरी
कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या लोंढ्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ अपेक्षित आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी एचपीसीएल, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि अशोका गॅस या कंपन्यांच्या प्रतिनिधींना लेखी सूचना केल्या आहेत.
२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या काळात पेट्रोल, डिझेल व सीएनजीची मागणी प्रचंड वाढणार असल्याने सर्व पेट्रोलपंपांवर बफर स्टॉक ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंपांवर पुरेशा प्रमाणात कर्मचारी तैनात ठेवून कामकाजाच्या वेळा स्पष्टपणे प्रदर्शित कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेशभक्त व पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी सर्व पेट्रोलपंपांवर हवा, पाणी आणि स्वच्छतागृहे मोफत व सहज उपलब्ध करून देण्याचे आदेशही दिले आहेत. विशेषतः महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची २४ तास व्यवस्था करण्याचे निर्देश पत्रात नमूद आहेत.
याशिवाय, शासकीय वाहने, आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका यांना प्राधान्याने इंधन पुरवठा करावा, तर विजेच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी जनरेटर आणि हँडपंपची व्यवस्था ठेवावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांच्या सोयीसाठी इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलल्याने उत्सवाच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असल्याची अपेक्षा आहे.