साडवलीत हृदयविकाराने प्रौढाचा मृत्यू
देवरुख : मखर बनवताना अचानक हृदयविकाराने प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील साडवली भुवडवाडी येथे घडली. अनंत पांडुरंग बडद (५५) असे या प्रौढाचे नाव आहे.
अनंत बडद व मुलगा अस्मित बडद गणेशोत्सवाची तयारी करत होते. सोमवारी रात्री मखर सजावट करत असताना ११ च्या सुमारास अनंत बडद यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून बडद यांना मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी बडद यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.