चिपळूण-कऱ्हाड वाहतूक सुरळीत
पावसाचा जोर ओसरला; एसटीचे नुकसान
चिपळूण: चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील वाहतूक गुरूवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आली. या मार्गावर पावसामुळे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती; परंतु गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरल्याने पाणी कमी झाले.
त्यामुळे गुरुवारी पुन्हा या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना व वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. सकाळी ११ वाजता चिपळूणमधून कऱ्हाडच्या दिशेने वाहने सोडण्यात आली. दोन दिवस हा मार्ग बंद असताना एसटीचे मोठे नुकसान झाले. चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आगारातील एकूण ३४ एसटीच्या फेऱ्या या मार्गावर धावतात.
त्यातून एसटीची मोठी उलाढाल होते. कोयनेपासून पुढे पाटणपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. जूनमध्ये वझेगाव दरम्यानचा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे १७ दिवस हा मार्ग बंद होता. काही ठिकाणी मातीचा भराव टाकून रस्ता बनवण्यात आला आहे तो वाहून जाण्याची भीती असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात चिपळूण-कऱ्हाड मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. चार दिवसाने या मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.