शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान : ना. सामंत
गणपतीपुळे : शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यात बराच मोठा फरक असून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाचे काम करत असताना रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपासह प्रगत बनत आहे. काळाच्या ओघात रत्नागिरी जिल्हा हा भविष्यात शैक्षणिक हब बनणार असून, माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असून, रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उद्यागमंत्री नामदार डॉ. उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर एक च्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या शनिवारी( २ ऑगस्ट ) रोजी झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी हा नररत्नाची खाण असून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे महनीय व्यक्तिमत्व झाले आहेत. त्यांच्या आदर्शाना अनुसरून कार्य करण्याची आज समाजाला गरज आहे. आदर्श जीवन शिक्षण शाळेला १७५ वर्षे होत आहेत, ही समस्त मालगुंडवासीयांना अभिमानाची बाब आहे. या शाळेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. महत्वाचे म्हणजे पूर्वीच्या काळात असणारी साधने आणि आताची शैक्षणिक साधने यात प्रचंड बदल होत असून हे बदल समाजातील प्रत्येकाने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी हे बदल स्वीकारले पाहिजे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील हा बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी पुढे आले पाहिजे. ज्या महामानवांनी हा देश उभारला त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घेत कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
मालगुंड येथे शनिवारी जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर एक या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमाला नामदार उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष, समिती सदस्य आणि शाळा मुख्याध्यापक आदींच्या वतीने सन्मानपूर्वक व यथोचित स्वागत करण्यात आले . त्यानंतर शाळेच्या मुख्य कार्यालयात शाळेविषयी आणि शतकोत्तर महोत्सबाबतची माहिती शाळेच्यावतीने नामदार उदय सामंत यांना देण्यात आली . त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव वर्षाच्या लोगोचे अनावरण आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन तसेच शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ फलकाचे अनावरण करण्यात आले. या शुभारंभ कार्यक्रमात 175 व्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालगुंड येथील महिला भगिनींनी मराठमोळ्या पेहरावामध्ये 175 दिव्यांनी नामदार उदय सामंत यांची ओवाळणी केली. त्यानंतर नामदार उदय सामंत यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन त्यांचेसमवेत फोटो काढून शतक महोत्सवी शुभारंभाचा आनंद द्विगुणित केला .या शुभारंभ महोत्सव कार्यक्रमात शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या 175 व्या वर्षानिमित्त शतकोत्तर अमृत महोत्सव समितीने 175 वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्याचा शुभारंभ नामदार उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी विश्वनाथ साळवी यांना वृक्ष लागवड करण्याचा मान देण्यात आला. त्यानंतर मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील कै. सदानंद बळीराम परकर सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शतकोत्तर अमृतमहोत्सवी समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर नामदार डॉ. उदयजी सामंत साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड क्रमांक १ मधील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी सनावळीसह शाळेचा इतिहास सांगत, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचा आढावा घेऊन, या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरुप सांगून पालकमंत्री डॉ. उदय सामंत साहेब यांना शाळेच्या विकसनासाठी विनंती केली.
यावेळी उपस्थित असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनीही शाळेच्या अभिमानास्पद वाटचालीचे कौतुक करत, प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मातृभाषा हे अत्यंत महत्वाचे साधन असून, प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजे यासाठी सर्वानी मराठी शाळेला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नामदार उदय सामंत यांचे समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत मेहेंदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट ,मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील तथा बंधू मयेकर, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनुर , शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार,मालगुंड च्या सरपंच श्वेता खेऊर,माजी सभापती साधना साळवी, मालगुंड हायस्कूलचे मुख्याध्यापक बिपिन परकर संचालक रोहित मयेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप,पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील आदींसह जीवन शिक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया शिर्के, सहशिक्षिका इंदुमती नाईक , शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष सदानंद केळकर सचिव विलास राणे, कोषाध्यक्ष डॉ. संतोष केळकर सदस्य विशाल लिंगायत, आनंद लिंगायत, ग्रा.पं. सदस्य शुभदा मुळ्ये, सन्मान मयेकर, रमानंद लिमये आदी मान्यवर तसेच महिला बचत गटाच्या भगिनी,विद्यार्थी, पालक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, मालगुंड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन वाटद कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रसिद्ध व्याख्यानकार माधव अंकलगे यांनी तर आभार प्रदर्शन जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत समितीचे कोषाध्यक्ष डॉ. संतोष केळकर यांनी केले.