तेर्ये बुरंबी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला
उपचारास विलंब झाल्याने गंभीर जखमी शेळीचा मृत्यू
फुणगुस:
तेर्ये बुरंबी येथील वसंत शिवराम चव्हाण यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळीवर उपचार करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षिकेने नकार दिल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेलेल्या जखमी शेळीने पशुपालक वसंत चव्हाण यांच्या डोळ्यादेखत जीव सोडला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री नंतर घडली.
तेर्ये बुरंबी गोपाळवाडी येथील वसंत चव्हाण यांचा त्यांच्या घराच्या बाजूलाच गोठा असून याच गोठ्यात त्यांच्या शेळ्या रात्रीच्या वेळी बंदिस्त असतात.चव्हाण कुटुंबीय रात्री गाढ झोपेत असताना चार वाजताच्या सुमारास गोठ्यात शेळ्या धडपडण्याच्या व शेळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने वसंत चव्हाण हे झोपेतून जागे होऊन शेळ्यांचे ओरडणे आणि धडपडणे का सुरु आहे हे पाहण्यासाठी त्यांनी घराचा दरवाजा उघडून थेट गोठ्याकडे धाव घेतली. मात्र यावेळी भेदरलेल्या शेळ्या व एक शेळी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत आहे. हे पाहून धक्काच बसला.
बिबट्याने गोठ्यातील शेळ्यांची शिकार करण्यासाठी आत शिरून एका शेळीवर हल्ला केला मात्र शेळयांच्या ओरडण्याच्या आवाजाने बाहेर आलेले पशुपालक वसंत चव्हाण यांच्या येण्याने बिबट्याला तेथून पळ काढावा लागला. सावज साधण्यासाठी केलेल्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी होऊन अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती. तिला औषधपचाराची खरी गरज होती. तर बाकीच्या शेळ्या बिबटयाच्या भितीने भेदरलेल्या होत्या.
जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या शेळीवर वेळीच औषधोपचार होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन ग्राम पंचायत सदस्य आंनद घवाळी यांनी या भागासाठी असलेल्या पशुधन पर्यवेक्षिकेला भ्रमणध्वनी वरून माहिती दिली असता त्यांनी स्वतः येण्यास नकार देऊन थेट खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचा शेतकऱ्यांच्या मनात राग व संतापाची भावना निर्माण होईल असा सल्ला देऊन आंनद घवाळी यांना पुढे बोलण्याची संधी न देता कॉल कट केला अशी माहिती आंनद घवाळी यांनी दिला.
अखेर पशुधन चे तालुका अधिकारी युवराज शेट्ये यांचा भ्रमणध्वनी मिळाल्या नंतर त्यांच्याकडे संपर्क साधल्यानंतर शेट्ये यांनी येऊन त्या शेळीवर उपचार केले यावेळी त्या अधिकाऱ्यांकडे त्या पशुधन पर्यवेक्षिकेने अकलेचे तारे तुटतील असा जो सल्ला दिला त्याबाबत कैफियत मांडली.
तालुका पशुधन अधिकाऱ्यांनी त्या शेळीवर उपचार केले खरे मात्र उपचाराला खूप उशीर झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेतील त्या शेळीने अखेर जीव सोडला. हे पाहून त्या पशुपालकांच्या नयनातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या.