पोकळी-चिपळूण मार्गावर 2 एसटींची धडक
चिपळूण : पोफळी-चिपळूण मार्गावर अलोरे येथे आज सकाळी दोन एसटींचा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन एसटी समोरासमोर धडकल्यामुळे दोन्ही एसटीच्या दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी ९ वाजता दापोली आगाराची एसटी पंढरपूरकडे निघाली होती. तसेच चिपळूण आगाराची एसटी पोफळीहून चिपळूणकडे येत होती. दोन्ही वाहने अलोरे येथील
भोपाळ कॉलनी येथील अवघड वळणावर आल्यानंतर समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती चिपळूण आगारात दिल्यानंतर चिपळूण आगारप्रमुख दीपक चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. तसेच अलोरे-शिरगांव पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात सुरू होते.