संगमेश्वरात घरात कोणी नसताना मीटर बदलले; ग्रामस्थ संतप्त
४० नागरिकांच्या सह्यांसह तक्रार अर्ज दाखल
संगमेश्वर : महावितरणचा ‘स्मार्ट’पणा सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आणि बेकायदेशीर कृत्यांनी भरलेला असल्याचे चित्र समोर येत आहे. घरात कोणी नसताना महावितरणचे कर्मचारी घरगुती मिटर बदलत आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना सक्त ताकीद देण्यात यावी संबंधितांना योग्य ती समज देऊन गावातील कोणत्याच मीटरची ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय कोणतीही छेडछाड केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश द्यावेत. अन्यथा महावितरण बाबत ग्राहकांचा रोष वाढवून कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशा आशयाची तक्रार महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कुंभारखणी बुद्रुक संगमेश्वर येथील ग्रामस्थांनी पोलिसात दिली आहे.
गावात आणि परिसरात महावितरणकडून जोरात स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. पण ना कोणती पूर्वसूचना, ना परवानगी, ना आदेश… आणि थेट घरात घुसून मीटर बदल! विशेष म्हणजे हे मीटर विशेषतः बंद घरे, कुलूप असलेले आवार किंवा गेट लावलेली घरे यांवरच बसवले जात आहेत.
या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला असून, हे मीटर बदलण्याची पद्धत पूर्णतः बेकायदेशीर आणि मनमानी कारभार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, सामान्य ग्राहक जेव्हा मीटर बदलतो तेव्हा त्याला अर्ज, शुल्क आणि वेळ लागतो. मात्र महावितरणने स्वतःहून हे मीटर बदलताना ना कोणताही शासकीय आदेश दाखवला, ना ग्राहकांची अनुमती घेतली. जुने मीटर बदलताना त्याचे अंतिम रीडिंग दाखवले जात नाही, आणि नवीन मीटरचे ‘शून्य’ रीडिंगही ग्राहकाच्या निदर्शनास आणले जात नाही. त्यामुळे भविष्यात चुकीच्या बिलाची शक्यता नाकारता येत नाही.