मजगाव मार्गे फणसवळे बस सुरू न केल्यास उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
रत्नागिरी, : तालुक्यातील मजगाव मार्गे फणसवळे ही सायंकाळी ६ ची बस सुरू करावी. ही बस नसल्यामुळे शाळा, कॉलेजच्या मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांना घरी येण्यास रात्री आठ ते नऊ वाजतात. मग त्यांनी अभ्यास कधी करायचा आणि खेळायचे कधी. मुलांची ही गैरसोय टाळण्यासाठी १ ऑगस्टपासून ही बस सुरू न झाल्यास ग्रामस्थ, पालक बस स्थानकात येऊन उपोषणाला बसू, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे एसटी विभागाला दिला.
फणसवळे ग्रामस्थानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी येथून सायंकाळी ६.०० वाजता सुटणारी मजगाव मार्ग फणसवळे बस फेरी सुरु करणेबाबत आपणास अनेकवेळा कळविण्यात आले होते.याबाबत आपल्याशी प्रत्यक्ष चर्चा देखील करण्यात आली होती. परंतु अद्यापही ही बस फेरी सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळा, कॉलेजच्या मुलांची फार गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही बस त्वरित सुरु न केल्यास १ ऑगस्ट पासून ग्रामस्थ/पालक रत्नागिरी बस स्थानकात उपोषणास बसतील याची नोंद घ्यावी. तसेच रत्नागिरी बसस्थानकामध्ये फणसवळेसाठी बस सुटण्याचा प्लॅटफॉर्म दर्शविणारा फलक जेथुन ग्रामीण (सर्विस) बस सुटतात त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तरी तो ज्या प्लॅटफॉर्म वरून फणसवळेसाठी शहरी बस सुटतात त्या ठिकाणी लावण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. फणसवळे सरपंच निलेश लोंढे, तंटामुक्तीचे संतोष आंबेकर, मुकेश माने, रामचंद्र आंबेकर, ग्रामस्थ गौरव नाखरेकर आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.