जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागस्तरावरून जिह्यात जागतिक लोकसंख्या दिन आणि सप्ताह साजरा होत आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आणि 11 ते 18 जुलै 2025 या कालावधीत जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला आहे. 2025 साठीची थीम आणि घोषवाक्य शीर्षक ‘नियोजित पालकत्वासाठी आरोग्यदायी वेळ आणि गर्भधारणेमधील अंतर’ आणि ‘आई होण्यासाठी योग्य वय’ हे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे.
सप्ताहात संपूर्ण रत्नागिरी जिह्यात आरोग्य विभागामार्फत ‘लोकसंख्या सप्ताह‘ निमित्ताने खालील उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये कुटुंब नियोजन शिबिरे: शासकीय रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजन नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जात आहेत. कुटुंब नियोजन विषयक जनजागृतीसाठी रॅली काढण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांवर कुटुंब नियोजन साधनांचे मोफत वाटप केले जात आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती व्याख्याने आयोजित केली जात आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी मुलांमध्ये लैंगिक शिक्षण आणि सुरक्षित आरोग्यावर मार्गदर्शन सत्रे घेत आहेत. आशा आणि आरोग्यसेवक-सेविकांमार्फत घरोघरी जाऊन कुटुंब नियोजनाची माहिती दिली जात आहे. विविध समाजमाध्यमांचा वापर करून ही जनजागृती केली जात आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश जनतेमध्ये लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, महिलांचे आरोग्य आणि हक्क याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या संपूर्ण सप्ताहात जिह्यातील आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेअंतर्गत विविध यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.
वाढती लोकसंख्या ही केवळ आकडय़ांची समस्या नाही, तर ती मानवतेच्या गुणवत्तेची परीक्षा आहे. आरोग्य सेवा, शिक्षण आणि जागरूकता हे या समस्येच्या उपाययोजनेसाठी महत्त्वाचे स्तंभ आहेत. शासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांनी एकत्र येऊन जबाबदारीने कृती केल्यास या आव्हानावर निश्चितच मात करता येईल.
डॉ. अनाध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.रत्नागिरी.