
सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांतून लोकसंख्या वाढीच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सहावी ‘ब’ वर्गातील कुमारी शाश्वती सुर्वे व रिशिक सुर्वे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने केली. त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे उद्दिष्ट आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत अभ्यासपूर्ण विचार मांडले.
यानंतर सौ. जान्हवी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहावी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी “लोकसंख्येचा विस्फोट ” या विषयावर घोषवाक्यांची रचना करत एक संवादात्मक एकांकिका सादर केली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जागवणारा संदेश दिला. एकांकिकेच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणाची गरज, त्याचे परिणाम आणि उपाय यावर प्रभावी प्रकाशझोत टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कार्यक्रम विभाग प्रमुख सौ. स्नेहा भागवत आणि सौ. जान्हवी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी स्वरदा खोत हिने तर आभारप्रदर्शन सार्थक आंब्रे या विद्यार्थ्याने केले.
या कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.